ऑस्ट्रेलियाच्या संघात अफलातून अष्टपैलू शेन वॉटसन याने धोनीच्याच संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळ केला. अर्थात, त्याच्या कारकिर्दीत त्याने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू तसेच विविध स्पर्धांमध्ये, विविध संघांचे प्रतिनिधित्व केले असले तरीही तो चेन्नई सुपर किंग्जचा अफलातून अष्टपैलू म्हणूनच ओळखला गेला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याची टिपीकल लढाऊवृत्ती जशी सिद्ध केली तीच त्याने चेन्नईकडून खेळताना सिद्ध केली.
अत्यंत भेदक मध्यमगती गोलंदाज व अत्यंत आक्रमक फलंदाज अशी त्याची ख्याती. खरे तर तो ऑस्ट्रेलियन कमी व इंग्लिशमॅन जास्त वाटायचा. टिपीकल ऑस्ट्रेलियन समोरच्या संघातील खेळाडूंचे फारसे कौतुक करताना दिसत नाही. सचिन तेंडुलकरचा अपवाद सोडला, तर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अन्य कोणत्याही खेळाडूला मान देताना कधी दिसले नाहीत. पण वॉटसन वेगळा होता. त्याने समोरच्या संघातील खेळाडूंकडून चांगले काय ते शिकून घेतले व त्याचा आपल्या कारकिर्दीसाठी कसा वापर करायचा याचा पाठपुरावाही केला. त्याची हीच शिकण्याची वृत्ती त्याला प्रत्येकवेळी फलदायी ठरली.
स्टिव्ह वॉ, मायकल बेव्हन, ग्लेन मॅक्सवेल, डेमियन मार्टिन या ऑस्ट्रेलियाच्या नावाजलेल्या अष्टपैलूंमध्ये सर्वात जास्त क्षमता असणारा खेळाडू म्हणून वॉटसनचे नाव सातत्याने घेतले जाते यातच त्याची गुणवत्ता स्पष्ट होते. यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाची सुमार कामगिरी झाली आणि त्यात वॉटसनलाही अपयशाचा सामना करावा लागल्याने व्यथित होत त्याने आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या स्पर्धेत ज्या खेळाडूंकडे सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून पाहिले गेले त्यात सर्वात जास्त चर्चा त्याचीच होत होती. कामगिरीवर सातत्याने टीका सुरू झाल्यामुळे नव्हे तर आपली कामगिरी होत नाही व त्यामुळे संघाचे नुकसान होत आहे.
आता नव्या खेळाडूंसाठी जागा करून द्यायलाच हवी, असा विचार करत त्याने क्रिकेटला बायबाय केले यातच त्याचा मोठेपणाही अधोरेखित होतो. असा निर्णय घेणारे किती खेळाडू असतात, असा विचार मनात येतो व सहजच हॅंड आय कोऑर्डीनेशन होते आणि नकळतच वॉटसनला सॅल्युटही केला जातो.