पुणे – शहरातील बाधित संख्या निम्म्याने कमी झाली. आजही दिवसभरात नव्याने 697 बाधित सापडले आहेत. मात्र, शहरात करोनामुळे सुरू असलेला मृत्युचा कहर आता ग्रामीण भागातही वाढला आहे.
गेल्या 24 तासात करोनामुळे 48 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या 25 जणांचा यामध्ये समावेश आहे. तर 23 मृत्यू हे शहर हद्दीतील आहे. शहरातील मृत्युच्या संख्येने 3 हजार 786चा टप्पा पार केला आहे.
शहरातील बाधित संख्येत मागील दहा दिवसांपासून लक्षणीय घट झाली. त्यामध्ये नमुने तपासणीची संख्या कमी केल्या असल्या तरी, प्रत्यक्षात बाधित संख्या घटत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात (दि. 1 ते 9) शहरातील बाधित संख्या 12 हजार 770 इतकी होती. त्याच तुलनेत ऑक्टोबरमध्ये ही संख्य निम्म्याने कमी झाली असून, दहा दिवसांत केवळ 6 हजार 570 बाधित सापडले आहेत. मात्र, मृत्युचे प्रमाण कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढलेलीच आहे.
शुक्रवारी (दि. 9) दिवसभरात 4 हजार 788 जणांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत शहरातील बाधित संख्या 1 लाख 52 हजर 897 वर पोहचली आहे. दिवसभरात 970 तर आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 375 बाधित करोनामुक्त झाले आहेत.