मुंबई: धारावीतील 56 वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला 23 मार्चपासून सतत ताप येत होता. त्यामुळे 26 मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या रक्त तपासणीत त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा मध्यरात्री मृत्यू झाला.
करोनाने गुणाकार सुरु केल्यानंतर त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही करोनाचा शिरकाव झाला आहे. धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत रुग्ण ज्या इमारतीत राहत होता त्या सभोवतालच्या सर्व बाजूंनी झोपडपट्ट्यांनी वेढलेले आहे. धारावी येथे कपड्यांचे दुकान असलेल्या मयताला 23 मार्च रोजी खोकला, सर्दी आणि ताप यासारखे लक्षणे दिसू लागल्या आणि 26 मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्याच्या कुटुंबीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केलेला नाही. त्याच्या घरातील 8 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा रुग्ण सापडला आहे. धारावी झोपडपट्टी सुमारे 613 एकर जागेत विस्तारलेली असून येथे 15 लाख नागरिक राहतात. ही मुंबई शहरातील सर्वात जास्त दाटीवाटीची वस्ती आहे. यामुळे धारावीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण मुंबईला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.