नातेवाईकांचा आरोप; रुग्णालयाकडून आरोपांचे खंडन
पिंपरी – ह्रदयविकाराचा झटका आलेल्या महिलेवर पैसे भरल्याशिवाय उपचारास रुग्णालयाने नकार दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीने तक्रार अर्ज दिला आहे. मात्र दोन महिन्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. या आरोपांचे रुग्णालय प्रशासनाने खंडन केले असून हृदयविकाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
चिखलीतील महिला अंबिका चित्ते यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना संभाजीनगर येथील धनश्री रूग्णालयात 13 ऑक्टोबर रोजी नेण्यात आले. रूग्णालयाने अगोदर पैसे भरा, असा आग्रह धरला. दुसऱ्या रूग्णालयात जा, अशी चिठ्ठीही दिली नाही, असे रुग्णाचे पती अशोक चित्ते यांनी निगडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दोन महिनेही अद्याप कारवाई झालेली नाही. दोषी रूग्णालयावर कारवाई करावी, म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
धनश्री रुग्णालयातील डॉ. संदीप कचाटे म्हणाले, अंबिका चित्ते यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यासाठी आवश्यक 30 ते 35 हजार रुपयांचे इंजेक्शन आणण्यास नातेवाईकांना सांगितले होते. दहा मिनिटांत सांगतो, असे मुलगा म्हणाला. मात्र त्या काळातच अंबिका यांचे ह्रदय बंद पडले. ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र यश आले नाही.