राजगुरूनगर -देशातील ग्रामीण भागातील महिला डॉक्टरांसह सर्व महिला कर्मचारी सेवा देत असलेल्या डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर (ऊउकउ) च्या पवार हॉस्पिटलमधून गुरुवारी (दि. 23) 2 तर बुधवारी (दि. 22) 13 अशा एकूण 15 जणांनी आतापर्यंत करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत, गुलाबपुष्प देत टाळ्या वाजवून त्यांना निरोप देण्यात आला.
राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद व पंचायत माध्यमातून गेली 15 दिवसांपूर्वी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेले परंतु अधिक लक्षणे नसलेल्या 45 बाधितांना या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सेंटरमधील 13 जणांनी करोनावर मात केल्याने बुधवारी त्यांना घरी सोडण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, हेल्थ सेंटरच्या डॉ. शीतल पवार यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या सेंटरमध्ये 50 बाधितांवर उपचार करण्याची सोय असून त्यात 12 बेडचे आयसीयू आहे. त्यांना जेवण, नाष्ट्याची आणि आवश्यक सुविधांची सर्व सोय करण्यात आली आहे. 3 महिला डॉक्टरसह 14 महिला कर्मचारी येथील 40 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करीत आहेत.
महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये 1408, राजगुरूनगरातील पवार हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये 75 बेडची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच चाकण येथे 2 हॉस्पिटलमध्ये सोय आहे. तालुक्यात आणखी डीसीएच हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. येथील सर्व कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रुग्णांची काळजी घेत आहेत. तर प्रशासन सर्व प्रकारच्या सेवा डॉक्टर आणि रुग्णांना पुरवत आहेत.
– अंकुश राक्षे, सभापती, पंचायत समिती, खेड तालुका