म्हणाले, आरोप करणारे थकून होतील शांत
सिएटल – सध्या करोनामुळे जगभरात आरोग्यविषयक आणीबाणी चालू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारबरोबरच काही व्यक्ती प्रयत्नशील आहेत. त्यात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आघाडीवर आहेत. मात्र, बिल गेट्स लसीच्या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात मायक्रोचीप सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला जात आहे. या आरोपामुळे हताश झालेले बिल गेट्स म्हणाले की, आरोप करणारे थकून शांत होतील.
बिल गेट लसीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शरीरात चीप टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून प्रत्येकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवता येईल, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. आतापर्यंत गेट्स यांनी या आरोपाकडे दुर्लक्ष केले होते.
बिल गेट्स करोना व्हायरसच्या अगोदरपासून लसीकरण प्रकल्पावर काम करीत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर रोगराईचा सर्वात जास्त परिणाम होतो. गरीब देशातील लोकांना रोग झाल्यानंतर औषध घेणे परवडत नाही. यासाठी रोग होऊ नये यासाठी लस विकसित करण्यावर त्यांचा भर आहे.
आताही त्यांनी करोनावरील लस शोधण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर उभे केले आहेत. एक महिन्यापूर्वी रशियातील कम्युनिस्ट पार्टीने मुखपत्रात भांडवलाचे जागतिकीकरण या मथळ्याखाली असे म्हटले होते की, लस बंधनकारक करून प्रत्येकाच्या शरीरात टाकण्याचा भांडवलवाद्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गेट्स जगभरातील लस विकसित करणाऱ्या अनेक संस्थांना आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लस विकसन अंतिम टप्प्यावर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुगल आरोपांना संपादित करणार
इंटरनेटवर अशा प्रकारचे भलते आरोप केले जातात. यासाठी अशा प्रकारची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी गुगल घेणार आहे. करोना व्हायरस अस्तित्वातच नाही, हा व्हायरस मायक्रोसॉफ्टने तयार केला आहे. काही देशांनी हा व्हायरस जैविक बॉम्ब म्हणून निर्माण केला आहे, असे अतार्किक आरोप होतात.