पारगाव शिंगवे – खडकी (ता. आंबेगाव) येथे अंगावर वीज पडल्याने एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मीरा सखाराम लोहकरे (वय 19) असे मूत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
सखाराम लोहकरे आणि त्यांची मुलगी मीरा लोहकरे गुरुवारी सातच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यांच्या घराजवळ अवघ्या 200 मीटरवर चिखल-मातीचा खड्डा असल्याने मुलगी मीरा लोहकरे गाडीवरून खाली उतरली आणि पुढे चालत जात होती. यावेळी तिच्या अंगावर वीज पडल्याने मीरा लोहकरे हिचा मूत्यू झाला. काही अंतरावर असणारे वडील सखाराम लोहकरे यात जखमी झाले आहेत.
खडकी येथील भोरदरा येथे सखाराम लिंबाजी लोहकरे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी मीरा लोहकरे ही मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मुलीचा मृतदेह मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता, यावेळी तहसीलदार रमा जोशी, तसेच खडकीचे सरपंच कृष्णा भोर, माजी उपसरपंच अशोक भोर, उपसरपंच दीपक बांगर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.