आताचा फडके हौद आहे, तेथे मागे हा हरीपंत फडके यांनी स्थापन केलेला गणपती आहे. हरीपंत फडके हे पेशवाईत मराठ्यांचे सेनापती होते. त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते गणेशभक्त होते. त्यांनी पुण्यात तीन गणेशमंदिरे बांधली जी खूप प्रसिद्ध झाली. त्यातील एक कोथरूड येथील दशभुजा गणपती मंदिर, सिंहगड रस्त्यावर एक मंदिर आहे आणि फडके हौद चौकाजवळ स्वत:च्या वाड्यात गणेशाची स्थापना केली. या गणपतीला दशभुज वल्लभेश म्हणतात.
फडकेंचा वाडा अतिशय मोठा सातचौकी होता. येथे गणपतीचे मंदिर होते. गाभारा, मोठा लाकडी सभामंडप, असे त्याचे बांधकाम होते. नव्या रचनेत येथे गाभारा आणि पुढे, बाजूला मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. गणेशाची दहा भुजा असलेली ही मूर्ती संगमरवरी आहे. ती आजही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. गणपतीची मूर्ती अतिशय सुबक दीड ते दोन फूट आणि डाव्या सोंडेची आहे.
या मूर्तीच्या बाजूलाच द्विभुज देवीची मूर्ती आहे. त्या काळातील पद्धतीप्रमाणे लाकडी मखरात गणेशाची मूर्ती एका उंच चौरंगावर बसवली आहे. या मूर्तीला प्रभावळ देखील कोरण्यात आली आहे. त्रिशूळ, कमळ, गदाधारी, धनुष्यबाण आणि अन्य आयुधे, असे मूर्तीचे वर्णन आहे.
मूर्तीच्या शेजारी दगडी उंदीर आहे. याची स्थापना केलेले हरीपंत हे गणेशभक्त होते; त्यामुळेच त्यांनी आयुष्याच्या अंतिम समयी अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक येथे जाऊन देह ठेवला. सध्या या मंदिराची मालकी फडके यांच्या वंशजांकडेच आहे.