पुणे – चैतन्य आणि मांगल्याने भारलेला सर्वांचा प्रिय असा गणेशोत्सव (ganpati) उद्यापासून (दि. 19 सप्टेंबर) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. तर, घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे पुणे (pune) शहर सजले आहे.
यंदाच्या वर्षी शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई (dagdusheth ganpati) सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
उद्या (दि. 19 सप्टेंबर) सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.
सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर हनुमानाच्या 4 मूर्ती लावण्यात येणार आहेत.
मुख्य मंदिर, आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅंड, प्रभात बॅंड, मयूर बॅंड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.