‘तौक्‍ते’ चक्रीवादळाचा गोव्यासह कोकण किनारपट्टीला सर्वाधिक फटका; शेकडो कुटुंबांचं स्थलांतर

सतेज औंधकर
सिंधुदुर्ग – गोवा किनारपट्टीसह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या किनारपट्टीला तौक्‍ते चक्रीवादळाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. गोव्यात कोळंब, काणकोण किनारपट्टीवरती समुद्राने रौद्ररूप धारण करत मोठे नुकसान केले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून “एनडीआरएफ’च्या वतीने या ठिकाणचे मार्ग पूर्ववत सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून झाडे आणि विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.

त्यामुळे विद्युतप्रवाह खंडित झाला असून किनारपट्टीवरील बहुतांश गावे अंधारात आहेत. यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर ती झाली असून पुढील 48 तास गोव्यासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे.

गोव्याच्या किनारपट्टीवर “तौक्‍ते’ चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवला आहे. गोव्यातील कोळंब काणकोण किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकून येथील रस्ताही समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी येथील रहिवाशांच्या घरातही गेले आहे. सिंधुदुर्गातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

गोव्यातील समुद्रात पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. इथल्या रस्त्यांचेही लाटांच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणचा रस्ता वाहून गेला आहे. दरम्यान, समुद्राचे हे पाणी या भागातील काहींच्या घरातही घुसले आहे. जोरदार वाऱ्यामुळे किनारपट्टी परिसरातील झाड आणि खांब हे रस्त्यावरती पडले आहेत. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून ते मार्ग पूर्ववत्‌ सुरू करण्यासाठी एनडीआरएफच्या मदतीने काम सुरू झाले आहे.

सिंधुदुर्गातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात चक्रीवादळाच्या मेघगर्जनेसह दाखल झालेल्या वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्‍क्‍याने विद्युत मीटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला.

दरम्यान, मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीवरती असणाऱ्या सर्व गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह तुफानी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक घरांची पडझड झाली असून झाडेदेखील उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी किनारपट्टीवरदेखील असाच काहीसा प्रकार घडला आहे.

कोकण रेल्वेला फटका, ट्रॅकवर झाड कोसळले
अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. रविवारी सकाळी नेत्रावती एक्‍स्प्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असता ट्रेनवर झाड कोसळल्याने मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या लोहमार्गावर पडलेले झाड हटवण्याचे काम सुरू असून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवरील शेकडो कुटुंबांचे स्थलांतर
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीवर धडकलेल्या या वादळामुळे जिल्हा प्रशासन नावाची वतीने शेकडो कुटुंबीयांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोळगड, मुसाकाझी या भागात वाऱ्यासह पाऊस कोसळत होता वादळाच्या पार्श्‍वभूमीवर आंबोळगड येथील 100 कुटुंबातील 671 व्यक्‍तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुसाकाझी येथील दोन कुटुंबे, आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्‍तीचे स्थलांतर करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.