पोलीस निरीक्षक जीवन माने ः नागरिक, तरूणांनी काळजी घ्यावी
भिगवण-वाढते ऑनलाइन व्यवहार व ग्रामीण भागात सजगतेचा अभाव यामुळे फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. बॅंक अथवा शासकीय कार्यालयातून आत्मविश्वासाने सांगून तांत्रिक माहिती घेतली जात आहे. याबाबत नागरिक, तरूणांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.
सध्या भारतात इंटरनेटची सेवा खेडेगावापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसत आहे. मोबाईल वापरत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडत नाही. इंटरनेट, तसेच मोबाईलच्या वापराने मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत.
आजची तरुण पिढी सायबर विश्वात अधिक ऍक्टीव दिसत आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट तर त्यांना जीव की प्राण वाटत आहेत. ऑनलाईन सेल कधी, कोणत्या दिवशी या सर्व बाबींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते; परंतु ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात जशीजशी वाढ होत आहे, तसतसे फसव्या शॉपिंग वेबसाइटचे पेव फुटले आहे. त्यामुळे त्यातून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारातही वाढ होत आहे.
घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ नोकरी देणे, परदेशात चांगल्या कंपनीत तुमची निवड झाली आहे. तुम्हाला लॉटरी लागली आहे, आदी आमिषे दाखवून राज्यातील शेकडो तरुण, तरुणी, नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याचे लोण आता ग्रामीण भागात आल्यामुळे तरूण – तरूणी याला बळी पडत आहेत.
सध्या बेरोजगारांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच नोकरीच्या शोधात असलेले तरुण- तरुणी आर्थिक फायद्याच्या भावनेत अशा आमिषांना बळी पडत आहेत. त्यातून गुंतवणुकीचा निर्णय घेतात, मात्र त्यात त्यांची फसवणूक होते. अशा अमिषांना बळी पडून पैसे गुंतवणूक करू नका, असे आवाहनही पोलिसांकडून केले जाते, मात्र, यावर कायमचा उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा हा फसवणुकीचा आलेख ग्रामीण भागात वाढल्याशिवाय राहणार नाही.
ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमांतून नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सायबर सेलकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही नागरिक या आमिषांना बळी पडत आहेत. यामध्ये अनेकांची काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत फसवणूक होत आहे. ऑनलाइन पध्दतीने फसवणूक करणारे परदेशातून तसेच परराज्यांतून सूत्रे हाताळत असल्याने त्यांना जेरबंद करण्याचेही मोठी आव्हान पोलिसांपुढे असते.
- फसवणुकीचे मार्ग-
– सैन्यदलात जवान असल्याचे भासवून फसवणूक.
– परदेशात चांगल्या कंपनीत तुमची निवड झाली आहे.
– सुंदर तरुणी सोबत आँनलाइन डेटिंगचे अमिष.
– तुम्हाला लॉटरी लागली आहे.
– घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ नोकरी देणे - काळजी कशी घ्याल-
– फेसबुकवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नये.
– फेसबुक अथवा इन्स्टाग्राम वरुन ओळख झालेल्या व्यक्तीला मोबाईल क्रमांक देऊ नका.
– परदेशातून पाठविलेल्या भेटवस्तू सोडवून घेण्यासाठी पैसे भरु नका.
– सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नये.
– पैसे भरण्यास सांगत असल्यास आधी संबंधीत विभागाला फोन करुन खात्री करा.
– विश्वसनीय वेबसाईटवरुनच खरेदी करावी.
– ओटीपी, एटीएम कार्ड नंबर शेअर करू नका.
– यूपीआय पिन इतर कुणाशीही शेअर करु नये.