किव्ह, (युक्रेन) – युक्रेनच्या लष्कराच्या वेबसाइटवर आज एकापाठोपाठ एक अनेक सायबर हल्ले झाले, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही बॅंकांवर देखील सायबर हल्ले झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे तणाव निर्माण झालेला असतानाच हे सायबर हल्ले झाले आहेत. आज झालेले सायबर हल्ले हे भविष्यातील अधिक घातक सायबर हल्ल्यांची नांदी असेल असे आता तरी सूचित केले गेलेले नाही.
आजच्या सायबर हल्ल्यांमुळे युक्रेनमधील किमान 10 महत्वाच्या वेबसाइटशी संपर्क साधला जाऊ शकत नव्हता. यामध्ये संरक्षण, परराष्ट्र आणि सांस्कृतिक मंत्रालयांच्या वेबसाइटचा अंतर्भाव आहे. याशिवाय युक्रेनमधील दोन सर्वात मोठ्या बॅंकांच्या वाबसाइटचाही यात समावेश आहे. या वेबसाइटवर अनावश्यक डाटा याऊन पडत आहे. त्यामुळे या वेबसाइटशी संपर्क साधला जाऊ शकत नाही आहे. या सायबर हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे, हे माहीत नसल्याचे युक्रेनच्या सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. सायबर हल्लेखोरांच्या तावडीतून यंत्रणा बाहेर काढून पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या लष्कर आणि प्रायव्हेट बॅंकेच्या होस्टिंग प्रोव्हायडरवरही सायबर हल्ला केला गेला आहे. मात्र बॅंकेतील खातेदारांच्या ठेवींना कोणताही धोका नाही. मात्र या हल्ल्यामागे नक्की कोण आहे, हे आताच सांगता येऊ शकत नाही, असे इंटरनेट ऍनालिसिस कंपनीने म्हटले आहे.
रशियाचा हात असल्याचा संशय
या सायबर हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. रशियाच्या आक्रमक योजना यशस्वी होऊ शकत नसल्याने आता हा मार्ग निवडला गेला असावा, असे मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पण नक्की कोणाचा हात आहे, हे तज्ज्ञांकडून शोधून काढायला थोडा वेळ लागेल, असे युक्रेनियन सायबर डिफेन्स अधिकारी व्हिक्टर झोरा म्हणाले. रशियाने 2014 मध्ये क्रिमियातील बंडखोरीचा फायदा करून हा प्रदेश रशियाला जोडून घेतला. तेंव्हापासून रशियातील सायबर हल्लेखोरांकडून युक्रेनमध्ये अधूनमधून सायबर हल्ले होतच आले आहेत.