बर्मिंगहॅम – भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी घानाचा 5-0 असा धुव्वा उडवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. भारताकडून गुरजीत कौरने दोन गोल केले. तर नेहा गोयल, संगिता कुमारी आणि सलीमा टेटे यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
सलामीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटूंनी सर्व विभागांमध्ये वर्चस्व राखले असले तरी पहिल्या दोन क्वार्टरमध्ये त्यांची कामगिरी निराशाजनक होती. विशेष म्हणजे, मिडफिल्ड आणि फॉरवर्डलाइनमध्ये संघ कमकुवत दिसला. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमण करत घानावर दबाव आणत तिसऱ्याच मिनिटाला गुरजीतने पहिल्या पेनल्टी कॉर्नरला उजव्या कोपऱ्यात जोरदार ड्रॅग-फ्लिक मारून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये घाना संघाने दडपण झुगारत आक्रमण केले. पण त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही. मध्यांतरानंतर भारताने दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु दोन्ही वाया गेले. संगीता कुमारीने 36व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी वाढवली.
FULL-TIME 😍#WomenInBlue cruised past Ghana with a 5-star display to register a big win in their first game of the Birmingham 2022 Commonwealth Games!#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/R1SLddF5NP
— Hockey India (@TheHockeyIndia) July 29, 2022
त्यानंतर लगेचच भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचा सदुपयोग करण्यात संघाला अपयश आले. मात्र, 39व्या मिनिटाला गुरजीतने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केल्याने भारताची 4-0 अशी निर्णायक आघाडी झाली. त्यानंतर भारताचे आणखी तीन पेनल्टी कॉर्नरही वाया गेले. परंतु सलीमाने 56व्या मिनिटाला आणखी एक गोल करत 5-0 असा विजयावर शिक्कामोर्तब केला.