World Cup 2023 India vs Afghanistan :- भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली बुधवारी आपल्या घरच्याच म्हणजे दिल्लीच्या मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील हा त्याचा घरच्या मैदानावरील कारकिर्दीतील पहिलाच सामना ठरला आहे.
त्यातच आजवर कोहलीने केलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून अरुण जेटली स्टेडियमच्या एका स्टॅण्डला कोहलीचे नावही काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. त्यामुळे निवृृत्त होण्यापूर्वीच असे पॅव्हेलियन किंवा स्टॅण्डला नाव दिलेला कोहली सचिन तेंडुलकरनंतरचा भारताचा केवळ दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माचे वादळी शतक, विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक तसेच इशान किशन व श्रेयस अय्यर यांची उपयुक्त फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर यजमान भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं 35 षटकात 2 गडी गमावत 273 धावा करत विजय साकारला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
कोहलीने या सामन्यात यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. त्याने नाबाद 55 धावांच्या खेळीत 56 चेंडूत 6 चौकार फटकावले. तर रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावाची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि पाच षटकार लगावले.