अहमदाबाद – भारतातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गतविजेता इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा सलामीचा सामना चालू झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासलेले असल्याने सामन्यात इंग्लंडचेच पारडे जड राहणार आहे.
इंग्लंड संघ करणार प्रथम फलंदाजी…
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक (Toss) जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाहीये. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच वेळी, बेन स्टोक्सचा इंग्लंडच्या प्लेइंग-11 मध्ये समावेश नाही.
ENG Vs NZ Live Update :
सध्या सामना सुरू झालेला असून ताजे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडच्या 20 षटकात 3 बाद 112 धावा झाल्या आहेत.
ENG Vs NZ Live Update : इंग्लंडला तिसरा धक्का…
रचिन रवींद्रने न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. हॅरी ब्रूकने आपल्या पहिल्या आणि डावाच्या 17व्या षटकात धावा केल्या. ब्रूकने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर सहाव्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात डेव्हन कॉनवेकरवी सीमारेषेवर झेलबाद झाला.
ENG Vs NZ Live Update : इंग्लंडला दुसरा धक्का…
इंग्लंड संघाला दुसरा धक्का 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर बसला. मिचेल सँटनरने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो 35 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. सॅंटनरच्या चेंडूवर तो डॅरिल मिशेलकरवी झेलबाद झाला.
ENG Vs NZ Live Update : इंग्लंडला पहिला धक्का…
इंग्लंडला पहिला धक्का डेव्हिड मलानच्या रूपाने बसला. आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅट हेन्रीने त्याला बाद केले. 24 चेंडूत 14 धावा करून मलान यष्टिरक्षक टॉम लॅथमकडे झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.