वाहतूक कोंडी : निवडणूक प्रचार अन् नागरिकांच्या खरेदीचा “योग’
पिंपरी –विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्यात पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने रविवारी (दि. 13) पिंपरी बाजारात नागरिकांची एकच गर्दी पहायला मिळाली. यामुळे पिंपरी बाजार परिसरात इंदिरा गांधी उड्डाणपुलापासून ते शगुन चौकापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अवघ्या दोन आठवड्यावर दिवाळी आल्याने शहरातील नागरिकांनी आतापासून काही वस्तुंची खरेदी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये लहान मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्याने पालकांसोबत लहान मुले सुद्धा बाजारात आपल्याच थाटात दिसत होते.
दोन आठवड्यावर आलेली दिवाळी आणि अवघ्या आठ दिवसांवर आलेली विधानसभेची निवडणूक या दोन्ही महत्वाच्या उत्सवामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. पिंपरी बाजार पुण्याच्या तुलनेने स्वस्त असल्याने पिंपरीत बाजार करण्यासाठी उपनगरीय भागातून नागरिक खरेदीसाठी येतात. त्यात निवडणूक प्रचार सुद्धा शिगेला पोचला असल्याने प्रचाराचा गोंधळ आणि त्यात पिंपरी बाजार परिसराचा असलेला चिंचोळा भाग गर्दीने फुलून
गेला होता.
मात्र बाजार करण्यास आलेल्या नागरिकांनी आणलेली दुचाकी लावायची कुठे? असा त्यांना प्रश्न पडत होता. येथे कुठलीही पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्यावरच पार्किंग करावी लागल्याने परिसरात वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.
उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात लाखोंच्या संख्येने राज्यातील व परराज्यातील विविध भागातील नागरिक उदरनिर्वाहासाठी येतात. मात्र, दिवाळी आल्यावर सर्वांची आपल्या गावी जाण्याची लगबग सुरू होते. त्यामुळे आतापासूनच खरेदी अटोपून घेत असल्याचे चित्र आहे. तसेच काही दिवाळी निमित्ताने बाजारात काय नवीन आले.