पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहाजवळ उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातून पलायन केलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22, रा. बोरावकेनगर, ता. दौंड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह देवगण अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण (रा. लिंगाळी माळवाडी ता.दौंड, जि. पुणे) हे दोघे मोक्का प्रकणातील तर, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेले अंजिक्य उत्तम कांबळे ( रा. टिळेकरवाडी ता. हवेली जि. पुणे) आणि सनी टायरन पिंटो (रा. काळेवाडी) हे 16 जुलै रोजी तात्पुरत्या कारागृहाचे गज कापून पळाले होते.
यापैकी गणेश याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तो मोक्का प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. इतर साथीदारांबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.