थिरूवनंतपुरम, – केरळमधील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. सी. चाको यांनी आज कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत ऐन निवडणूक काळात पक्षाला मोठा धक्का दिला आहे. पक्षात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. केरळात कॉंग्रेस केवळ दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. त्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत आहोत असे चाको यांनी म्हटले आहे. केरळात कॉंग्रेस असा पक्षच आता उरलेला नाही, जे काहीं उरले आहे ते केवळ दोन गट आहेत. या गटात सहभागी झाल्याशिवाय तुम्हाला कोणतेही काम करता येत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
केरळात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर यावी असे आम्हाला मनापासून वाटते पण पक्ष सत्तेवर येण्यासाठी उमेदवार निवड ही सर्वांना विचारून करायला हवी होती. तशी ही निवड झाली नाही. प्रदेश नेत्यांशी चर्चा न करताच उमेदवार निवडले गेले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 74 वर्षीय चाको हे पक्षाचे ज्येष्ठ नेते मानले जात होते ते माजी लोकसभा सदस्यही आहेत. कॉंग्रेसमध्ये हुकुमशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात असा आरोप करून त्यांनी म्हटले आहे की उमेदवार निवडीत पक्षाने राज्यातील नेत्यांशी चर्चा केली नाही. ऐन विधानसभा निवडणूक काळात चाको यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडणे हा पक्षाला मोठा झटका मानला जात आहे.