- रस्त्यावर फिरताना थांबवून केली करोना चाचणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस यांनी शनिवारी (दि. 22) शहरातील 10 नाकाबंदीच्या ठिकाणी अचानक 593 वाहन चालकांनी करोना चाचणी केली. यामध्ये 37 जण करोना बाधित असल्याचे दिसून आले.
पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या हळुहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरीही दररोज सातशेहून अधिक करोना बाधित नव्याने मिळून येत आहे. ज्या करोना बाधितांना लक्षणे दिसून येत नाही (सुपर स्प्रेडर) त्यांच्याकडून करोनाचा नकळत मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. अशा सुपर स्प्रेडरचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलिसांच्यावतीने शहरातील दहा नाकाबंदीच्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान 593 वाहन चालकांची अचानक तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये तब्बल 37 वाहन चालक करोना बाधित असल्याचे दिसून आले. यापैकी बहुतांश वाहन चालकांना करोनाची काहीच लक्षणे नव्हती. विशेष म्हणजे बाजारपेठेच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक करोना बाधित आढळून आले. यामध्ये चिंचवडमधील चापेकर चौक आणि पिंपरीतील जमतानी चौक या ठिकाणी सर्वाधिक करोना बाधित आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.