रांजणगाव गणपती (पुणे) – शिरूर तालुक्यातील पंचतारांकित असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गाडी रस्त्यात अडवून शिवीगाळ करून दमदाटी करुन भंगाराचा ठेका तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम वाबळे व अन्य तिघेजण (पूर्ण नाव व पत्ते माहिती नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अभिजित शिंदे यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. 31) सकाळी अभिजित शिंदे व त्यांचा इतर स्टाफ कंपनीच्या मोटारीतून जात असताना आरोपी शुभम वाबळे याने त्याच्या 3 साथीदारांसह रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसमोर गाडी अडवून शिंदे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच इंडिया सिया ग्रेझेसेल मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील भंगाराचा ठेका तसेच दरमहा 15 हजार रुपये देण्यासाठी मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभम वाबळे व त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.