क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्माण नवा आदर्श
मेलबर्न – क्रीडा क्षेत्रात तसेच जागतिक क्रिकेटमध्ये महिलांना आई बनल्यानंतर खेळापासून दूर व्हावे लागते. मेरि कोमसारख्या काही खेळाडू सुपरमॉम बनून धडाक्यात पुनरागमन करतात. मात्र, सगळ्यांनाच ते शक्य नसते. या सर्व परिस्थितीचा विचार करून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवा आदर्श निर्माण केला आहे. आता देशातील महिला क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना मॅटर्निटी लिव्ह देण्यात येणार आहे.
आई झाल्यानंतर महिला खेळाडूंना एकतर निवृत्ती घ्यावी लागते, किंवा नोकरी सोडावी लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सोसावे लागते. असे होऊ नये यासाठी हा नवा आदर्श क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्माण केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माता बनणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना एक वर्षाची पगारी सुट्टी किंवा त्यांचा करार कायम ठेवत या काळातील वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील जेस डफिन या योजनेचा लाभ मिळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. ही योजना सुरू करणारे क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे जगातील पहिलेच क्रिकेट मंडळ ठरले आहे.
देशातील महिला खेळाडूंना दिलासा द्या
मुष्टियुद्धपटू मेरि कोम व टेनिसपटू सानिया मिर्झा या सुपरमॉम म्हणून ओळखल्या जातात. माता बनल्यानंतर त्यांनाही काहीकाळ खेळापासून लांब राहावे लागले होते. मेरीने दणक्यात पुनरागमन साजरे केले, आता सानिया देखील पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून प्रेरणा घेत भारतातील क्रिकेटसह सगळ्याच क्रीडा संघटनांनी आपल्या खेळाडूंची कारकीर्द वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला पाहिजे, अशीही मागणी होत आहे.