पुणे :– एम टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अथर्व येलभर यांनी, तर मुलींच्या गटात श्रावी देवरे यांनी विजेतेपद संपादन केले. दुहेरीत स्वर्णिम येवलेकर व नमिश हुड, काव्या देशमुख व श्रेया होनकन यांनी विजेतेपद पटकावले.
नवसह्याद्री क्रीडा संकुल टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत अथर्व येलभर याने स्मित उंडरेचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1 तास 30 मिनिटे चालला. अथर्व हा एमटीबी बालवडकर शाळेत नववी इयत्तेत शिकत असून सुनील कुसाळकर टेनिस अकादमीत प्रशिक्षक सुनील कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत श्रावी देवरेने जान्हवी चौगुलेचा 6-0, 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले. श्रावी ही सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिकत असून एम टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात स्वर्णिम येवलेकर व नमिश हुड या जोडीने समिहन देशमुख व सनत कडले यांचा 7-6(5), 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात काव्या देशमुख व श्रेया होनकन यांनी सारा फेंगसे व प्रार्थना खेडकर यांचा 7-6(4), 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवसह्याद्री सोसायटी समिती सदस्य उमेश भिडे, विनायक करमरकर, प्रकाश सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक केतन धुमाळ, शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशनचे केतकी जोगळेकर, सारिका गडदे, सोनाली देशमुख, आशिष जोगळेकर, राजेश गडदे, एआयटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी उपस्थित होते.