मुंबई – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भाडेकरू कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड मदन नाईक (वय 88) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने (रविवार,26 मार्च) निधन झाले. विक्रोळी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भाडेकरू चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मदन नाईक यांच्या नेतृत्वातील भाडेकरू कृती समितीने अनेक भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळाला. नाईक यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग घेतला होता. कॉ. मदन नाईक यांच्या निधनाने पक्षाने एक सहृदयी मार्गदर्शक आणि ओजस्वी स्फूर्तिस्थान गमावले असल्याची भावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केली आहे.
“पथिक’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध झाले होते. माकपचे ज्येष्ठ दिवंगत नेते, माजी आमदार प्रभाकर संझगिरी यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते. नोकरीच्यानिमित्ताने कॉम्रेड नाईक हे कोकणातून मुंबईत आले होते. सुरुवातीला ते गिरगाव भागात राहत होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी – केंद्रीयमंत्री दानवे
कामगारांच्या परिसरात कम्युनिस्ट कलापथकांचे पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमातून ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. कम्युनिस्ट कलापथकातही त्यांनी काही काळ काम केले होते. कॉ. नाईक यांनी औद्योगिक कामगारांसोबत बेघर आणि झोपडपट्टीवासीयांना संघटित करत त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न धसाला लावला.