कोपर्डे हवेली – शिरवडे (ता. कराड) येथे अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गाभण गाय मृत्यूमुखी पडली. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. नेमका कोणता प्राणी असू शकतो या शंकेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेने शिरवडेसह तासवडे, नडशी, शहापूर येथील ग्रामस्थांमध्ये रानातील वस्तीवरील जनावरांच्या संरक्षणाबाबत सावधानता बाळगली जात आहे. शिरवडे येथील सुशांत जगन्नाथ जगदाळे यांच्या शिरवडे- नडशी रस्त्यावर ओढ्याजवळ शेतातील वस्तीवर जनावरांसाठी गोठा आहे. शेती करण्याच्या उद्देशाने जवळपास अनेक शेतकऱ्यांचे गोठे आहेत. येथेच जनावरांच्या शेडवर वन्य प्राण्याने हल्ला करून तीन महिन्यांची गाभण गाय ठार केली.
ही घटना गुरुवारी रात्री अकराचे सुमारास घडली. सुशांत जगदाळे नेहमीप्रमाणे रात्री जनावरांना वैरण टाकून आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता घडलेली घटना त्यांच्या निदर्शनास आली. वन्य प्राण्याने गळ्यावर तसेच पाठीवर हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता जाधव, तलाठी राजेंद्र मोहिते, पोलीस पाटील ताजुद्दीन संदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मसूर पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. दामोदर कोकरे यांनी मृत गायीचे शवविच्छेदन केले. हल्ला केलेला प्राणी निश्चित सांगता येणार नसल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण आहे. मृत गायीची किंमत सुमारे एक लाख रुपयांच्या दरम्यान असल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे सुशांत जगदाळे यांनी सांगितले. सध्या दुधाला चांगला दर असून दुधाळ गाई म्हशींच्या किंमतीही भरमसाठ आहेत.