कोरोना व्हायरस आणि पौष्टिक आहार

आहारा बद्दलचे समज-गैरसमज

जगभरात करोना व्हायरस जितक्‍या वेगाने पसरला, तितक्‍याच वेगाने त्याबद्दलचे गैरसमजही पसरले. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे अनेक दिशाभूल करणारे सल्ले तळागाळात पोहोचले. यातले अनेक सल्ले आहार आणि जीवनशैलीबाबत होते. अमूक खाऊन करोनाला पळवून लावता येईल, तमूक टाळून करोनापासून संरक्षण मिळेल, हे सप्लीमेंट घेऊन प्रतिकारशक्‍ती वाढवता येईल आणि तो काढा घेऊन कोरोना मरून जाईल असे सल्ले छातीठोकपणे देणारे स्वयंघोषित तज्ञ घराघरात दिसू लागले. अशा सल्ल्यांमागे वहावत जाऊन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवू नका! त्यापेक्षा करोना व्हायरस आणि आहाराबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्‍न आणि त्यामागील वैज्ञानिक वस्तुस्थिती या लेखातून समजून घ्या.

– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत

करोना व्हायरस अन्नाद्वारे संक्रमितहोऊ शकतो का?
नाही. असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. करोनाला वाढण्यासाठी होस्ट (मनुष्य किंवा प्राणी) यांची आवश्‍यकता असते. तो अन्नात वाढू शकत नाही.

अंडी, मासे, कोंबडी किंवा इतर मांसाहारातून करोना पसरू शकतो का?
करोनाचा प्रसार प्राण्यांपासून (विशेषत: खवले मांजर, वटवाघूळ अशा वन्य प्राण्यांपासून) झाला असण्याची शक्‍यता वर्तविली गेली आहे. परंतु नेमका स्रोत अद्याप माहित नाही. अंडी, चिकन, मासे व्यवस्थित धुवून (विशेषतः गरम पाण्याने धुवून) त्यानंतर पुरेसे शिजवल्यास त्यातील सर्व प्रकारचे विषाणू नष्ट होतात. त्यामुळे हे पदार्थ चांगले शिजवून खायला काहीच हरकत नाही. या पदार्थांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात जी तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

आईस्क्रीममधून कोरोना पसरतो का?
नाही. आईस्क्रीममध्ये हा विषाणू नसतो. पण जंतुसंसर्ग झाला असताना, घसा दुखत असताना किंवा खोकला झाला असताना आईस्क्रीम खाणे टाळावे.किटो डाएट घेतल्याने मी करोनाच्या

संसर्गापासून दूर राहू शकतो का?
नाही. किटो डाएटमुळे करोनापासून संरक्षण मिळते, असा कोणताही पुरावा नाही.
सारखे गरम पाणी पित राहिल्याने किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिल्याने कोरोना विषाणूच्या

संसर्गापासून दूर रहाता येईल का?
पुरेसे पाणी पिणे हे जरी शरीरासाठी चांगले असले तरी वारंवार गरम पाणी पिऊन अथवा गुळण्या करून करोना संसर्गापासून दूर रहाता येईल हा समज चुकीचा आहे.

लसूण खाल्ल्याने करोनाचे विषाणू मरतात का?
लसूण खाणे हे जरी तब्येतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्‍तीसाठी चांगले असले तरी लसूण खाल्ल्याने कोरोनाचे विषाणू मरू शकत नाहीत किंवा त्याच्या संसर्गापासून कोणतेही संरक्षण मिळत नाही.
एखादा विशिष्ट अन्नपदार्थ प्रतिकारशक्‍ती वाढवू शकतो का किंवा कोरोना व्हायरसची लागण

होण्यापासून रोखू शकतो का?
नाही, असा कोणताही जादूई खाद्यपदार्थ अस्तित्वात नाही! निरोगी जीवनशैली (नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी विश्रांती) रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते.

आहार: आहारात वैविध्य ठेवणे, विविध रंगाच्या भाज्या व फळे खाणे, पुरेशी प्रथिने घेणे हे महत्त्वाचे आहे. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी निम्म्यापेक्षा जास्त पेशी शरीरात वसाहती करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या असतात. यातील उपयुक्त सूक्ष्मजीव आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यास मदत करत असतात. या सूक्ष्मजीवांचे खाद्य म्हणजे आहारातील तंतूमय पदार्थ, डाळी-कडधान्ये आणि आंबवलेले पदार्थ. त्यामुळे अशा पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा.

व्यायाम : व्यायाम शरीरातील रक्‍ताभिसरण वाढवून पांढर्या रक्‍तपेशींना कामाला लावतो. त्यामुळे आठवड्यातून मिनिटे मध्यम तीव्रतेचा किंवा मिनिटे जास्त तीव्रतेचा व्यायाम चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी गरजेचा आहे.

झोप आणि मानसिक स्वास्थ्य : योग्य आहार आणि नियमित व्यायाम याबरोबरच पुरेशी झोप आणि विश्रांती देखील महत्त्वाची आहे. ताणतणाव आपली प्रतिकारशक्ती कमी करतात. थकलेले आणि तणावाखाली असलेले शरीर जंतुसंसर्गाला लवकर बळी पडते.

थोडक्‍यात, उत्तम जीवनशैली आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवते. पण एका ठराविक मर्यादेपलिकडे प्रतिकारशक्ती वाढवणे शक्‍य नसते. त्यामुळेच उत्तम प्रतिकारशक्ती आणि ठणठणीत तब्येत असणार्यांना करोनाचा संसर्ग होणारच नाही असे सांगता येत नाही. पण संसर्ग झाल्यास त्यातून लवकर बाहेर पडण्यास प्रतिकारशक्ती मदत करते. वृद्ध, आजारी व कुपोषित व्यक्‍ती करोनाच्या संसर्गाला लवकर बळी पडतात आणि त्यांच्यात जंतुसंसर्गाचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात ते त्यांच्या कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळेच.

व्हिटॅमिन सी ची सप्लीमेंट्‌स घेतल्याने कोरोना संसर्ग टाळता येईल का?
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक अशी अनेक जीवनसत्वे व खनिजद्रव्ये प्रतिकारशक्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. पण यांची सप्लिमेंट्‌स घेऊन कोरोना टाळता येईल यात काही तथ्य नाही. व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळत असल्याने शरीरात साठवून ठेवता येत नाही.

म्हणूनच सप्लीमेंट्‌स पेक्षा हे घटक आहारातून घेणे चांगले. आवश्‍यक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी रोजच्या आहारात एकूण ताज्या भाज्या व फळे (शक्‍यतो एक लिंबूवर्गीय फळ) यांचा समावेश करणे पुरेसे आहे.

करोना संक्रमित व्यक्तीने तयार केलेले किंवा हाताळलेले अन्न खाल्ल्यास कोरोनाची लागण होऊ शकते का?

करोना व्हायरस खोकताना आणि शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांवाटे पसरतो. संक्रमित लोकांच्या शौचामध्ये देखील हा विषाणू सापडला आहे. म्हणून एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे तो अन्नात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे विशेषतः कच्च्या, न शिजवलेल्या आणि थंड अन्नाच्या बाबतीत तसेच खाण्यासाठी वापरल्या गेलेल्या साहित्याबाबतीत लागू पडते. म्हणून अन्न तयार करताना आणि हाताळताना सर्व खबरदारीचे उपाय घेणे.

करोनाच्या दृष्टिकोनातून खाण्या-पिण्याच्याबाबतीत कोणती खबरदारी घ्यावी?
खाण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि शिजवलेले अन्न हाताळण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
फळे, भाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात.

खाण्याची भांडी, स्वयंपाकाचा ओटा यांची नेहमीपेक्षा जास्त वेळा व काळजीपूर्वक साफसफाई करावी.
आजारी असल्यास अन्न शिजविणे व अन्न हाताळणे टाळावे.

बाहेरचे अन्न (विशेषत: कच्चे अन्न, फळांचे रस, रस्त्याच्या कडेला असलेले उघड्यावरचे खाद्यपदार्थ), बाहेरचे पाणी आणि थंड पदार्थ (आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक्‍स) टाळावे.

घरचे, योग्य प्रमाणात शिजवलेले, ताजे व सकस अन्न घ्यावे. प्रथिने, जीवनसत्वे व खनिजद्रव्यांनी युक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारात विविधता ठेवावी.

भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घावेत. गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा) घ्यावीत. काढा करण्यासाठी आले, तुळस, हळद, पुदीना, लवंगा, ज्येष्ठमध यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा वापर करावा.

जेवणाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटी-गाठी/पार्ट्या टाळाव्यात.तंबाखूचे सेवन आणि मद्यपान टाळावे. अतिरिक्त मद्यपान प्रतिकारशक्ती कमी करते तर धूम्रपान फुप्फुसांची कार्यक्षमता कमी करून जंतुसंसर्गाला आमंत्रण देते.

करोना व्हायरस आणि आहार याबाबत माहिती मिळवताना तिची विश्‍वासार्हता तपासून पहावी. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये. (लेखिका आहारतज्ञ आहेत.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.