हैदराबाद – भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. ही लस करोनावर 77.8 टक्के प्रभावी ठरत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत ही लस 65.2 टक्के इतकी प्रभावी आहे.
ही लस गंभीर स्वरूपाच्या कोविड विकारावर 93.4 टक्के प्रभावी ठरत आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स देशातील 25 शहरांतील 130 सिम्पटोमॅटिक कोविड पेशंटवर घेण्यात आल्या.
कोव्हॅक्सिन ही लस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि यांच्या मदतीने विकसित करण्यात आली आहे.
या संबंधात बोलताना भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष कृष्णा इला यांनी सांगितले की, या लसींच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्यानंतर भारतामध्ये अशा प्रकारची नावीन्यपूर्ण औषधे व लसी शोधण्याची क्षमता आहे असे जगापुढे सिद्ध झाले आहे.
भारताने केलेल्या या संरक्षणाचा लाभ संपूर्ण जगातील लोकांनाही होणार आहे असेही त्यांनी सांगितले. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची लस विकसित करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी अहोरात्र कष्ट घेतले, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गवर यांनी दिली.