पुणे – पहिल्या आयोध्या वॉरियर्स करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्कॉर्पियन क्रिकेट क्लब संघ आणि कल्याण इलेव्हन संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आर्च मॅव्हरीक्स् संघाने चौथा विजय साकारत बाद फेरीकडे वाटचाल केली.
उच्चांकी धावसंख्येच्या सामन्यात 451 धावांचा पाऊस पडला. पार्थी नाईकर याच्या तुफान फटकेबाजीमुळे स्कॉर्पियन क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा 5 गडी आणि 4 चेंडू राखून पराभव केला. फार्मा इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना गणेश आंब्रे (77 धावा), अमोल नाजन (40 धावा) व गणेश साळुंके (28 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 6 गडी गमावून 225 धावांचा डोंगर उभा केला. स्कॉर्पियन क्रिकेट क्लबने लक्षाचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. किरण दातार (51 धावा) आणि भूषण सवे (46 धावा) या दोघांनी 43 चेंडूत 94 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर अमित देशपांडे (47 धावा) आणि पार्थी नाईकर (42 धावा) यांनी तुफान फटकेबाजी करून स्कॉर्पियन संघाला 19.2 षटकात विजय मिळवून दिला.
कल्याण इलेव्हन संघाने शिवनेरी क्रिकेट क्लबचा 47 धावांनी पराभव केला. कल्याण संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केतन पासलकर (35 धावा), रोहीत गुगळे (29) व चिराग शेरकर (26) यांच्या फलंदाजीमुळे 19.4 षटकात 10 गडी गमामून 160 धावांचे आव्हान उभे केले. शिवनेरी क्रिकेट क्लब हे आव्हान पेलू शकला नाही व त्यांचा डाव 15.5 षटकात व 113 धावांवर आटोपला. कल्याण संघाच्या केतन पासलकर (2-25), रोहित घुले (2-15) यांच्यासह रोहित ठाकूर (3-3) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
शुभम शिंगाटे याच्या नाबाद 60 धावांच्या जोरावर आर्च मॅव्हरीक्स् संघाने गेम स्विंगर्स संघाचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव करत सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक ः
गटसाखळी फेरी : 1) फार्मा इलेव्हन ः 20 षटकात 6 बाद 225 धावा. (गणेश आंब्रे 77, अमोल नाजन 40, गणेश साळुंके 28, प्रतिक लव्हळेकर 2-22) पराभूत वि. स्कॉर्पियन क्रिकेट क्लब: 19.2 षटकात 5 बाद 226 धावा. (किरण दातार 51, अमित देशपांडे 47, भुषण सवे 46, पार्थी नाईकर 42, अमोल नाजन 3-29). सामनावीर ः पार्थी नाईकर.
2) गेम स्विंगर्स : 20 षटकात 9 बाद 127 धावा. (क्षितीज तांबे 21, अभय चौगुले 20, जयंत सावंत 3-21, विमल हंसराज 2-20) पराभूत वि. आर्च मॅव्हरीक्स ः 14.1 षटकात बिनबाद 129 धावा. (अभिषेक चौधरी नाबाद 39, शुभम शिंगाटे नाबाद 60). सामनावीर ः शुभम शिंगाटे.
3) कल्याण इलेव्हन : 19.4 षटकात सर्वबाद 160 धावा. (केतन पासलकर 35, रोहीत गुगळे 29, चिराग शेरकर 26, सुमित खोले 5-10, सचिन मांजरे 2-22) वि. वि. शिवनेरी क्रिकेट क्लब : 15.5 षटकात सर्वबाद 113 धावा. (सुनिल टक्के 35, वैभव पाटील 15, केतन पासलकर 2-25, रोहीत ठाकूर 3-3, रोहीत घुले 2-15). सामनावीर ः केतन पासलकर.