पुणे : – स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या स्पार्टन मान्सुन लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन आणि रायझिंग स्टार्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयांचा चौकार नोंदविला. कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाने पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.
या स्पर्धेत कुणाल शहा याने फटावलेल्या 62 धावांच्या जोरावर कल्याण इलेव्हन संघाने रायझिंग बॉईजचा 6 गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग बॉईजने 151 धावा धावफलकावर लावल्या. हे आव्हान कल्याण इलेव्हनच्या कुणाल शहा (62 धावा) आणि जितेंद्र राऊत (55 धावा) या फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर 16.1 षटकात सहज पूर्ण केले.
अभिषेक कौशिक याने केलेल्या नाबाद 112 धावांच्या खेळीमुळे रायझिंग स्टार्स संघाने सॅफरॉन क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबने 220 धावांचा डोंगर उभा केला. नचिकेत कुलकर्णी (47 धावा), श्रीपाद भागवत (36 धावा) आणि रोहन देशमुख (नाबाद 35 धावा) यांनी संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. रायझिंग स्टार्सने हे आव्हान 18 षटकात पूर्ण केले. अभिषेक कौशिक याने नाबाद 112 धावांची खेळी साकारली. त्याला कुंज एस. (47 धावा) आणि हेमंत पाटील (31 धावा) यांनी सुरेख साथ दिली व संघाचा विजय सोपा केला.
धावांचा पाऊस पडलेल्या आणि दोन शतके नोंदवले गेलेल्या सामन्यात नितीन चौहानच्या कामगिरीच्या जोरावर कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाने पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा 4 गडी राखून पराभव केला. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने पहिल्यांदा खेळताना 205 धावांचे आव्हान उभे केले.
स्वानंद भागवत याने 46 चेंडूत 8 चौकार व 8 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाने ही धावसंख्या 18.3 षटकात व 6 गडी गमावून पूर्ण केली. नितीन चौहान याने संघ संकटात असताना केवळ 39 चेंडूत 8 चौकार आणि 13 षटकारांसह नाबाद 124 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.