कोपरगाव : शहरातील काही व्यापारी, डॉक्टर हे दुबई येथे मागील आठवड्यामध्ये सहलीसाठी जाऊन आले असून त्यातील काही जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याची जोरदार अफवा आज शहरभर पसरली होती. त्यातून अनेकांनी तर्कवितर्क लढवत चर्चा केली. मात्र त्या तिघाही डॉक्टरांची कोरोनाची चाचणी निगेटिव्हच आली असल्याने त्यांना शासनाने घरी सोडून दिले आहे. त्यामुळे तालुक्यासह शहरवासीयांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे जाहीर आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी नागरिकांना केले आहे.
शहरातील काही जण दुबई वरून आले त्यांची सविस्तर माहिती तहसीलदार यांनी घेतली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. त्यातील काही जणांना तातडीने सोडून देण्यात आले. मात्र पाच जणांची सामान्य सर्दी व खोकल्याची जाणीव झाल्याच्या कारणावरून चाचणी करण्यासाठी शनिवारी (दि .१४ मार्च ) अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांच्या तपासणी केली असता त्यांना कसलीही बाधा न झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.
त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामकाजाला सुरुवात केली असून पैकी एक डॉक्टर दैनंदिन कामकाजासाठी मुंबई येथे गेल्याने शहरात अफवा पसरली आहे, असे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये, असे जाहीर आवाहन तहसीलदार चंद्रे व डॉ. फुलसौंदर यांनी केले आहे. चुकीच्या अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध शासनाच्या नियमानुसार गुन्हा दाखल केला जाईल असेही शेवटी चंद्रे यांनी बोलताना सांगितले.