वाघोली -वाघोली-केसनंद रोडवरील काळूबाईनगर परिसरातील 65 वर्षांच्या वृद्धाला तर बालाजी पार्क परिसरातील 8 वर्षाच्या मुलाला करोनाची बाधा झाली आहे. दोन्ही ठिकाणी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. वाघोली प्राथमिक केंद्राच्या वतीने परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. वाघोली-केसनंद रोडवरील परिसरामध्ये आत्तापर्यंत 5 रुग्ण सापडले आहेत यापैकी 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 3 ऍक्टिव आहेत.
वाघोलीमध्ये आत्तापर्यंत 25 करोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 7 रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मास्क न घालणाऱ्या 50 जणांवर कारवाई
वाघोली परिसरामध्ये मास्क न घालणाऱ्या 50 जणांवर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांत केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून 100 रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला आहे.