वरिष्ठ नेत्याचा एका कंपनीसाठी आयुक्तांवर दबाव
पिंपरी – महापालिका हद्दीतील जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पास्को या कंपनीला थेट पद्धतीने ठेका देण्यास विरोध करणाऱ्या एका पिंपरीतील नेत्याने आता हा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात यावा यासाठी पालिकेत हेलपाटे मारण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका बाजूला विरोध आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे निर्णय करून घेण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.
महापालिका परिसरातील जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम पास्को एन्व्हायरमेंट सोल्युशन या संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेला दिलेल्या कामाचा कालावधी संपुष्टात आला आहे. तर सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात केले जाते. या ठिकाणी असलेला प्लॅंट मोशी येथील कचरा डेपो येथे हलविण्यात येणार आहे. हा प्लॅंट हलविण्यास आणि पुढील पंधरा वर्षे थेट पद्धतीने काम कोणतीही निविदा न काढता पास्को या कंपनीला देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता.
हा ठराव सध्या तहकूब करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेसमोर हा ठराव ठेवल्यानंतर निविदा काढण्यात यावी, थेट पद्धतीने काम देण्यात येऊ नये, 15 वर्षांचा करारनामा करू नये, अशा मागण्या पिंपरीतील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केल्या होत्या. मात्र आता या नेत्याला नवा साक्षात्कार झाला असून मुंबईस्थित एका कंपनीला हे काम देण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित नेत्याने दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या कंपनीला ठेका देण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट कोविड संदर्भात असल्याचे भासविण्यात आले. एका बाजूला महापालिकेत विरोधक असलेली राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेत नसताना याच पक्षाचा एक वरिष्ठ नेता आता स्वार्थासाठी पास्कोला विरोध आणि दुसऱ्या कंपनीचे गोडवे गात असल्याने या नेत्याचा आणि पक्षाचाही दुटप्पीपणा समोर आला आहे.