नगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून बळजबरीने मद्यपान करत तिच्या अल्पवयीन मुलास मारहाण करत सिगारेटचे चटके दिल्याच्या आरोपावरुन अखेर आज चौघांजणांविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व कर्मचारी बाळू घाटविसावे व मुलाच्या आईचाही संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी चाइल्ड लाइनच्या समन्वयकांनी फिर्याद दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या घरी या संशयित आरोपींचे गेल्या एक ते दोन वर्षांपासून जाणे-येणे होते. 13 जूनला रात्री हे संशयित आरोपी “त्या’ महिलेच्या घरी रात्री उशिरा दारू घेऊन पोहचले होते.
दरम्यान, त्यांचा रात्री जोराचा आरडाओरडा ऐकूण जागे झाल्याने त्या अल्पवयीन मुलाने या दारू पार्टीला विरोध केला होता. त्यावेळी शंकर मिसाळ याने मुलाच्या डाव्या हाताला सिगारेटचे चटके दिले. तसेच तेथून निघून जाण्यासाठी दरडावले. त्यावेळी डॉ. अनिल बोरगे याने पायातील बूट फेकून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी तेथून पळून गच्चीवर गेले. तेथे पाठलाग करत आलेल्या घाटविसावे याने गच्चीवरून फेकून देण्याचा प्रयत्न केला. तेथून सुटका करून मी बेडरूममध्ये जाऊन बसलो. तेथे मिसाळ याने दरवाजावर लाथा मारल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचवेळी कायमचा काटा काढण्याची भाषा आरोपींनी केल्याने माझ्या जीविताला धोका असल्याची फिर्याद त्या अल्पवयीन मुलातर्फे देण्यात आली आहे.तोफखाना पोलिसांनी या फिर्यादीवरुन भादंवि कलम 324, 504, 506 व 34 तसेच बाल अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे अधिक तपास करत आहेत.