नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या ही प्रशासना समोरील मोठे आवाहन बनले असून त्यातच प्लाझ्मा, रेमडेसिविरचा तुटवडा याचा अनेक करोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज तालुका प्रशासनाकडून बाधितांची आकडेवारी व त्यासंबंधीचा गोषवारा जाहीर केला जातो; परंतु खरी आकडेवारी याहून वेगळी असते हे कटू सत्य आहे.
रुग्णाला करोनाची लक्षणे दिसू लागल्यास अनेक रुग्ण खासगी लॅबमध्ये अँटिजेन चाचणी करून घेतात. अशावेळी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करून गृह विलगीकरण कक्षात राहतो अशा रुग्णांची आकडेवारी प्रशासनास उपलब्ध होत नाही. आजही जुन्नर तालुक्यातील अनेक लॅबमध्ये रुग्णांची स्कॅन करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून येते. याबद्दलची सविस्तर माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. लॅबमध्ये होत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
करोना रुग्णाचा स्कोअर नऊ, दहा किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास रुग्णाच्या पायाखालची वाळू सरकते आणि सुरू होते ती ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठीची धावपळ; परंतु तालुक्यातील अनेक खासगी कोविड सेंटरमधून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बेड नाकारला जातो तर काही हॉस्पिटल थोडासा वशिला, ओळख किंवा जवळचा असेल तर तात्काळ बेड उपलब्ध करून देत असल्याचे करोना रुग्णांचे म्हणणे आहे.
अशावेळी सर्वसामान्य रुग्णांची मोठी धावपळ होते तरी अशा खासगी कोविड हॉस्पिटलवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे
म्हणणे आहे.