बारामती – दरवर्षीप्रमाणे जर यंदाही तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर स्वतःला जरा आवर घाला. याचं कारण असं की, जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाचे काळे ढग दाटून आले असून अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाची सध्या समाज माध्यमांवर करडी नजर असून कोणी एप्रिल फूलचा मेसेच व्हायरल केला तर त्याला जेलची हावा खाण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
नारायण शिरगावकर म्हणाले की,1 एप्रिल 2020 रोजी एप्रिल फूल होऊ नका रस्त्यावर येऊ नका. करोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. 1 एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे मॅसेज एप्रिल फूल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात. जमाबंदी उठले आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे.
अशा एप्रिल फूलसाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजला कोणीही बळी पडू नये, अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यांवर त्याचबरोबर ग्रुप ऍडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ग्रुप ऍडमिनने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ऍडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे, असे आवाहन शिरगावकर यांनी केले आहे.