पुणे: करोनाच्या लढाईत पोलीस कर्मचारी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत. या लढ्यात पोलिसांना देखील करोना होत असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोवका निर्माण झाला आहे. त्यामुळे ५५ वयोवर्षा पुढील, तसेच व्याधी विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटी मधून वगळण्यात यावे अशी मागणी ऍड. विराज करचे पाटील, ऍड. आनंद धोत्रे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ऍड. पाटील यांनी दिली.
करोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून लाखो लोकाचे बळी घेतले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी आहोरात्र झटत आहेत. पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कडा पहारा देत आहेत. मात्र, आता या रक्षकांना करोनाची लागण होत असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे.
पोलीस बांधव ड्युटीवर असताना त्यांना करोनाची लागण झालेली आहे. पोलीसांना कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या कुटूंबियांना देखील विलगीकरण व आरोग्य तपासणीस सामोरे जावे लागत आहे. अकारण पोलीसांचा कुटुंबीयांना जिवातास व आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपुढील व व्याधी, विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटी मधून वगळण्यात यावे, तसेच त्यांना कार्यालयीन कामकाज सोपविण्यात यावे, शारिरीक दृष्टीने अनफीट पोलीसांना विशेष बाब म्हणून रजा देण्यात यावी, अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती ऍड. पाटील आणि ,ऍड.धोत्रे यांनी दिली.