धक्‍कादायक! चीनमध्ये एकाच दिवसात 15 हजार नागरिकांना कोरोनाची लागण

वुहान : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा तांडव काही केल्या थांबत नाही. त्यातच आता देशामध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1368 झाली आहे. विशेष म्हणजे चीनमधील वुहानमध्ये एकाच दिवसात 242 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. तर 15 हजार नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 60 हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. जपानमध्ये गुरुवारी कोरोनामुळे पहिला रुग्ण मृत्युमुखी पडला.

2002-03 मध्ये चीनमध्ये सार्सची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी या आजाराने 774 जणांचा बळी गेला होता. तर 8100 रुग्णांना याची लागण झाली होती. त्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचे आणि त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.

एकूण 27 देशांमध्ये 59804 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना ही आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचे आधीच जाहीर केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता गृहीत धरून भारताने सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. भारताने आवश्‍यक औषधांचा साठा करून ठेवला असून, आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना संदर्भातील घडामोडींवर भारतातील आरोग्य विभागातील अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.