वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन एकत्र करणार काम
पुणे – शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत करून तिला गती देण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून एकत्रितपणे प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात बुधवारी महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन विभागाचे उपायुक्त संजीव भोर, महापालिका अधिकारी अनिरुद्ध पावसकर, व्ही. जी. कुलकर्णी, माधव जगताप, श्रीनिवास बोनाला, विजय दहिभाते, राजेंद्र राऊत, माधव देशपांडे, जयंत भोसेकर, नितीन उदास, सुरेश जगताप, ऍड. निशा चव्हाण, विलास कानडे, प्रवीण गेडाम उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत आणि गतीमान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन यासारख्या प्रश्नांबाबत संयुक्त समितीमार्फत निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आले.
नागरिकांचा प्रवास सुसह्य, सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी पथारी व्यावसायिक, शहरात येणारी जड वाहने, प्रवासी बसेस, बंद अवस्थेत रस्ते आणि जागांवर पडून असलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने, प्रवासी थांब्याचे नियोजन, मेट्रोचे काम अशा विविध विषयांची चर्चा करून यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले. नो हॉकर्स झोन, मान्यताप्राप्त 45 रस्ते, महत्त्वाचे रस्ते, गर्दीचे चौक, रस्ते, त्या परिसरातील वाहतूक नियमन, पथारी व्यावसायिक आणि अतिक्रमणे याबाबत प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बेवारस वाहने होणार नष्ट
शहरातील बेवारस आणि अनेक दिवसापासून पडून असलेली वाहने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस आणि पालिका यांच्याकडून संयुक्तपणे नष्ट करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
“शहरातील वाहतूक समस्या आणि शहरातील अपघाताची संख्या कमी करण्याससाठी दोन्ही प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी काम करून शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुसह्य करणार आहेत.
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त