नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. पहिल्या लाटेतून काही प्रमाणात दिलासा मिळालेल्या महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेने कहर माजवला. रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर होता. आता करोना बळीच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात देशांतील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे.
महाराष्ट्रात करोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता १ लाखाच्या जवळ पोहोचली आहे. मृतांची संख्या महाराष्ट्रात सध्या ९९ हजार ५१२ पर्यंत पोहोचली आहे. दुर्दैवाने पुढील दोन ते तीन दिवसांत करोना बळींचा आकडा एक लाखांच्या पुढे जाईल अशी शक्यता आहे. तर देशातील मृतांचा आकडा ३ लाख ४६ हजार एवढा आहे.
करोनामुळं भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील करोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे. फ्रान्समध्ये 1.09 लाख लोकांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त रशिया (1,23,436), इटली (1,26,472 मृत्यू), यूके (1,27,836 मृत्यू), भारत (3,46,784 मृत्यू), ब्राझील (4,72,629 मृत्यू) आणि सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत (6,12,203 मृत्यू) झाले आहेत.
दरम्यान राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ आता १५ हजारांच्या खाली आहे. हा महाराष्ट्राला मोठा दिलासा म्हणाव लागेल. मात्र अद्याप करोनामुळे होणारे मृत्यू थांबलेले नाहीत.