रविवारी दिवसभरात आणखी नऊजणांना बाधा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांच्या आकड्याने आज दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. शहरातील दिवसेंदिवस बाधितांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनला आहे. रविवारी दिवसभरात पुन्हा नऊने करोनाबाधितांच्या संख्येत भर घातली आहे. यामध्ये चार पुरुषांचा तर पाच महिलांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढणारा आकडा हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागला असून आजच्या बाधितांसह शहरातील रुग्णांची संख्या 204 वर पोहोचली आहे.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार तब्बल 9 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आजच्या बाधितांमध्ये 27 ते 50 वर्षीय चार पुरुषांचा समावेश आहे. तर 19 ते 63 वयोगटातील पाच महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण दिघी, विकासनगर किवळे, आनंदनगर चिंचवड, मोरेवस्ती, पिंपळे गुरव, संभाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत. बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आजच्या सर्वच्या सर्व 9 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आज रविवारी नव्याने 91 संशयित महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल झाले असून त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 4490 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 4175 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आज पाठविण्यात आलेल्या संशयितांसह एकूण 127 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. एकूण 125 रुग्णांची आतापर्यंत करोनामधून मुक्तता झाल्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 64 झाली आहे. तर शहराबाहेरील 11 आणि शहरातील सक्रीय अशा एकुण 75 रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शहरातील रहिवाशी असलेल्या 11 बाधित रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.