नवी दिल्ली – ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या करोना लसीने जगभरात आशेचा एक किरण जागवला होता. मात्र या लशीचे एका रूग्णावर विपरित परिणाम जाणवल्यानंतर लशीची क्लिनिकल चाचणी तूर्त थांबवण्यात आली आहे. एका स्वयंसेवकात अज्ञात आजाराची पुसटशी लक्षणे दिसू लागल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अर्थात या घडामोडीचा भारतातील चाचण्यांवर आणि चाचण्यांच्या अवधीवर काही परिणाम होणार नसल्याचे भारतात या चाचण्या घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले होते. मात्र काही अडथळे निर्माण झाले आहेत, ही बाब मान्यच करावी लागेल.
त्या रूग्णाला झालेल्या आजाराच्या संदर्भात जोपर्यंत स्पष्ट माहिती मिळत नाही, तोपर्यंत चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. मात्र त्या पुन्हा केव्हा सुरू होतील, याबाबतची माहिती अद्याप ऍस्ट्रोझेनेकाने दिलेली नाही. हे जरी सगळे घडले असले तरी ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनेकाच्या या लशीच्या सुरक्षिततेबाबत अद्याप तरी कोणतीही शंका उपस्थित झालेली नाही. कारण कोणत्याही नव्या लशीच्या चाचणीत अशा घटना घडत असतातच. आताही जो अडथळा आला आहे, त्यामुळे थोडा विलंब होईल एवढाच काय तो फरक पडेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोणकोणत्या ठिकाणच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत, हेही अद्याप ऍस्ट्रझेनेकाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. ऑगस्ट महिन्यात शंभर जणांना ही लस देण्यात आली आहे. ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली आहे, त्यांच्यावर लशीचे काय परिणाम दिसून येतात याचा अभ्यास केला जाईल. सुरक्षेच्या निकषांची पडताळणी झाल्यावरच लशीला मंजूरी दिली जाईल व त्यांनरत इतर स्वयंसेवकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.