पुणे – घरात बेकायदा पद्धतीने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली. यामध्ये 84 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
बिंजाराम ऊर्फ विजय गणेश देवासी (24, रा. काळे पडळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. देवासी हा अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी तो बेकायदा पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी तेथे छापा टाकला.
यामध्ये 83 हजार 982 रुपये किंमतीचा विमल गुटखा, तुलसी, व्हिवन, आरएमडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर न्यायालयात हजर केले. त्यांनी आरोपीला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, बंडू शिंदे, सतीश वणवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.