बीजिंग – चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये नव्याने करोनाविषयक प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. शेन्झेन शहरातील उद्योग धंदे बंद करण्यात आले आहेत. तर डल्लान शहरातील लक्षावधी लोकांना पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले आहे.
यामुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासही उशीर होतो आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच चीनमधील शांघायसह अन्य काही भागांमध्ये निर्बंध लागू केले गेले होते. चीनमधील “झिरो कोविड’ धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते आहे. मात्र या धोरणामुळेच चीनच्या आर्थिक विकासाला खीळ बसू लागल्याची टीका आता चीनमधील विचारवंतांकडून केली जाऊ लागली आहे.
इलेक्ट्रॉनिक उद्योगातील अग्रगण्य असलेल्या हुआकिंगबेइ जिल्ह्यातील उद्योगापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. येथील उद्योग गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक चीप मॅन्युफॅक्चरिंग आणि ऍटोमोबाईल क्षेत्रातील लघु उद्योगांनाही अशाच प्रकारे काही दिवस आपले उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. चीनमधील करोना रुग्णांची संख्या 20 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. हॉंगकॉंगमध्येही अशाच प्रकारे करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. (Corona restrictions again in some cities in China)