हैदराबाद – दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर देशातील सगळ्यात महागडा म्हणजेच जास्त मानधन घेणारा अभिनेता झाला आहे अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर अल्लू अर्जूनला मार्केटिंग विश्वातीलही स्टारपद मिळाले आहे.
अल्लू अर्जुनचा आधी फक्त दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत दबदबा होता. पुष्पा द राईज या चित्रपटाच्या तुफान यशानंतर तो एका रात्रीत देशभर लोकप्रिय ठरला. त्याच्या चाहत्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्याशी निगडीत अगदी छोट्या गोष्टीदेखील सोशल मिडियावर लगेच व्हायरल होतात. त्याच्या याच वैशिष्ट्यामुळे आज तो मार्केर्टिंग जगतावरही राज्य करू लागला आहे. सोशल मिडियावरील त्याच्या प्रभावामुळे अनेक बड्या कंपन्यादेखील त्याला जाहिरातीत घेण्यासाठी रांगेत उभ्या ठाकल्या आहेत. त्यासाठी त्याला एका दिवसाच्या शूटींगसाठी कोट्यावधी रुपये देण्यासही तयार आहेत.
40 वर्षांचा हा अभिनेता आता देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला झाऊ लागला आहे आणि कुठल्याही ब्रॅंडसच्या दिवसभराच्या शूटींगसाठी त्याच्याकडून 7.5 कोटी रुपयांची मागणी केली जाते. त्याच्या देशभरातील लोकप्रियतेनंतर अनेक ब्रॅंडसनी त्याला घेऊन जाहिरातील केल्या आहेत. त्यामध्ये कोका-कोला, एस्ट्रल पाईप्स, केएफसी, रेडबस, झोमॅटो आदी कंपन्यांचा समावेश आहे.
अल्लू अर्जुनने गेल्या महिन्यात थायलंडमध्ये कोका-कोलाच्या जाहिरातीसाठी शूट केले. एप्रिलमध्येच ऑनलाईन बस टिकटिंग प्लॅटफॉर्म रेडबसचा तो ब्रॅंड अम्बेसिडर झाला आहे. 2017 ते 2019 या कालावधीतही तो रेडबसचा ब्रॅंड अम्बेसिडर होता.
असे सांगितले जाते की, एका प्रसिद्ध पान मसाला कंपनीने त्याच्यासमोर जाहिरात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी दिवसभराच्या शूटींगसाठी त्याला दहा कोटी रुपयांचे मानधन देण्याची तयारी ठेवली होती. तरीदेखील पान मसाल्यासारख्या व्यसनाधीनता वाढवणाऱ्या पदार्थांची जाहिरात करण्यास त्याने ठाम नकार दिला.
हन्सा रिसर्चच्या पाहणीनुसार अल्लू अर्जुन हा दक्षिणेतील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याची सर्वसामान्य जनतेमध्ये खोलवर ओळख आहे. त्याला ओळखण्याचा स्कोअर 85 टक्के एवढा आहे. म्हणजेच दक्षिणेत जवळपास 85 टक्के लोक त्याला ओळखतात. त्यानंतर दक्षिणेतील अभिनेत्री समंथा प्रभूचा क्रमांक लागतो. तिचा ओळख स्कोअर 74 टक्के एवढा आहे. व्यक्तीची ओळख, ती किती लोकांना आवडते, तिचा प्रभाव, आत्मविश्वास, बोल्डनेस, सोशल मिडियावरील चाहत्यांची संख्या यावरून व्यक्तीचा रेकग्निशन स्कोअर ठरवण्यात येतो.
ओळख असणाऱ्या सेलिब्रिटींच्या देभराच्या मानांकन यादीचा विचार केला तर त्यामध्ये अमिताभ बच्चन हे अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर एम. एस धोनी, विराट कोहली, अक्षयकुमार, शाहरूख खान, सलमान खान आणि मग इतरांचा क्रमांक लागतो. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता म्हणून कपिल शर्मा तर अभिनेत्रीमध्ये मौनी रॉय आघाडीवर आहेत. (Allu Arjun became the most expensive actor after the movie Pushpa; companies lined up for advertisement)