मुंबई : कोरोना विषाणूच्या उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.
रोजंदारीवर उदरनिर्वाह असलेल्यांसाठी काही विशेष सोय करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी असल्याचे मंत्री म्हणाले. तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्याबाबत केंद्राकडून परवानगी घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
कंपन्यांच्या बैठका ‘व्हर्चुअली’ घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कोरोना च्या उपाययोजनांसाठी मास्क,सॅनिटाझर्स,पीपीई कीट,व्हेंटिलेटर्स शासनासाठी देण्याचेही कंपन्यांनी मान्य केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच रुग्णांच्या आयसोलेशनसाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याबाबत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तयारी दर्शविली. जी औषधे अत्यावश्यक आहेत, ती देखील औषध कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी लूपीनचे यश महाडीक, सोनी पिक्चर्सचे मनू वाधवा, एचएसबीसी बँकेचे विक्रम टंडन, सिप्लाचे राजीव मेस्त्री, एल ॲण्ड टीचे डॅा. के.जे. कामत, अक्सेंच्यर्सचे आदित्य प्रियदर्शन, एसएचआरएमचे अंचल खन्ना, ग्लॅक्सो-स्मिथक्लाईनचे मीनाक्षी प्रियम,
डॅाएच्च बँकेचे माधवी लल्ल आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रिती चोप्रा, जॅान्सन ॲण्ड जॅान्सनचे सार्थक रानडे आणि राकेश साहनी, आयसीआयसीआय बँकेचे सौरभ सिंह, सिटी बँकेचे बी. सेंथिल नाथन, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीमा नायर, ले-नेस्टचे डॅा. मुकेश गुप्ता आदींचीही उपस्थिती होती.