मुंबई – बुली ऍप प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटकी केली आहे. आरोपींनी या ऍपवर मुस्लीम महिलेचे आक्षेपार्ह बदल केलेले फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अपलोड केले होते. अटक करम्यात आलेल्या आरोपींमध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार झा आणि मयंक रावत (वय 21) यांचा समावेश आहे.
बुली ऍप प्रकरणात अटक झालेली श्वेता सिंग उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहरातील निवासी आहे. मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या श्वेताने करोना काळात तिच्या वडिलांना गमावले. तर कॅन्सरमुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. सध्या श्वेताच्या कुटुंबात तिची मोठी बहीण आणि लहान बहीण व भाऊ आहे. मोठी बहीण कॉमर्स पदवीधर असून तिचे लहान बहीण भाऊ सध्या शालेय शिक्षण घेतायत. तर श्वेता देखील इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असल्याचं पोलिसांनी सांगितले.
बुली ऍप प्रकरणात श्वेताचा सहभाग नक्की कसा आहे, हे सध्यातरी कळू शकले नाही. मात्र श्वेताने ट्विटरवर अहिंदूवादी गोष्टीना प्रोत्साहन देता येईल यासाठी अनेक आयडी तयार केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
मुंबई पोलिसांनी श्वेताचा सहकारी विशाल याला देखील अटक केली. त्यानंतर काही काळातच श्वेताला देखील ताब्यात घेण्यात आले. विशाल आणि श्वेताची ओळख समाज माध्यमातून झाली असल्याचे कळते. दोघांनी मिळून बुल्ली ऍप तयार केले असल्याचे समजते. तसेच त्यावर आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यासाठी चार ट्विटरआयडी चा वापर त्यांनी केल्याचं कळलं आहे. या चार आयडीपैकी तीन श्वेता सांभाळत होती, तर एक आयडी विशाल सांभाळत होता. सध्या ती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.