नगर -जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुन्हा तीन करोनाबाधितांची भर पडली असून, कर्जत तालुक्यातील राशीन, पारनेर तालुक्यातील भाळवणी आणि संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील बाधितांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 269 झाली आहे. आज एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लॉकडाऊन अंशत: शिथिल झाल्याने जिल्ह्यात करोनाबाधितांचे प्रमाणात वाढले. त्यामुळे 67 वरून बाधितांची संख्या 269 वर गेली. यामध्ये जिल्ह्याबाहेरील अगंतुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आज त्यात पुन्हा तीन रुग्णांची भर पडली असून, पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेली 68 वर्षीय व्यक्ती बाधित झाली, तर संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
जिल्ह्यातील 220 रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज करोनातून बरा होऊन गेला घरी आहे. तो संगमनेर येथील आहे. त्यामुळे संगमनेरात एक करोना मुक्त झाला, तर एकाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेरात पुन्हा करोनाचा सीलसीला सुरू होतो की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तसेच जिल्ह्यात करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 220 वर गेली आहे.