नवी दिल्ली – कोविड-19 पासून वाचण्यासाठी आणि त्यासंबंधी अपडेट मिळवण्यासाठी गुगलने आपल्या मॅप्समध्ये नवीन फीचर्स आणले आहे. कंपनीने मॅप्समध्ये गुगल असिस्टेंट ड्राइविंग मोड हे नवीन फीचर आणले आहे. या मोडमधून अँड्रॉयड आणि आयओएस यूजर्सला रियल टाइममध्ये कोविडशी संबंधित अचूक माहिती मिळेल.
या नवीन फीचरनुसार, जर तुम्ही घराबाहेर निघालात आणि तुम्हाला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जायचे असेल किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणच्या कोविड संक्रमितांची माहिती आधी मिळेल.
गुगल मॅप्सवर हे फीचर अशावेळी आले आहे, जेव्हा भारतात परत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्ली सरकार गर्दीच्या ठिकाणी परत लॉकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. गुगल मॅप्स वापरकर्त्याला गर्दीच्या ठिकाणांची रिअल टाइम इन्फॉर्मेशन देईल. तर, मागच्या 7 दिवसातील कोरोना रुग्णांची संपूर्ण माहितीदेखील देईल.
या नवीन फीचरच्या मदतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्गदर्शक सूचना, चाचणी केंद्रे आणि लिंकची माहितीदेखील दिली जाईल. एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या सार्वकालिक (ऑल टाईम) करोनाबाधित रुग्णांच्या संख्येची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळेल.