पुणे – पुणे शहरात गेल्या चोवीस तासांत 753 करोनाबाधित आढळले असून, 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचारादरम्यान पुण्यातील सात जणांसह 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 735 झाली आहे. यापैकी 690 रुग्ण ऑक्सिजनवर असून 358 रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतची रुग्णसंख्या 2 लाख 9 हजार 83 झाली असून त्यापैकी 1 लाख 96 हजार 751 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत 4 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 6 हजार 735 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली असून आतापर्यंत करण्यात आलेल्या टेस्टची संख्या 11 लाख 98 हजार 536 झाली आहे.
शहरातील रुग्णसंख्या वाढत असून, ऍक्टिव्ह रुग्णांपैकी जवळपास 77 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. हे सर्वजण घरीच उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता, महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील ऑक्सिजन बेड तसेच विमाननगर येथे उभारलेल्या करोना सेंटरमध्येही ऑक्सिजन बेडस् सुरू केले आहेत.
तर, सीओईपी जंबो हॉस्पिटल कार्यन्वित करण्यासंदर्भात सीओईपीकडून स्ट्रक्चरल ऑडिटही करून घेण्यात आले आहे. 12 मार्चला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.