लंडन – युरोपात करोनाची पुन्हा मोठी लाट आली आहे. पहिल्यांदा अर्थात 2020 मध्ये जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता, तेव्हा त्याचा मोठा फटका युरोपला बसला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
आता पुन्हा करोनाने डोक वर काढल्यामुळे युरोपातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला असून त्यालाच आता येथील नागरिक वैतागले आहे. सरकारांच्या निर्णयाचा विरोध करत लोक आता रस्त्यावर उतरत आहेत.
जर्मनी, ऑस्ट्रिया, ब्रिटन, फिनलंड, रोमानिया आणि स्वित्झर्लंडसह अनेक युरोपीय देशांत लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. जर्मनीत तर निदर्शक आक्रमक झाल्यावर पोलिसांनाही आक्रमक भूमिका घेत पाणी, पेपर स्प्रेचा आधार घ्यावा लागला आणि लाठीमारी करावा लागल्याच्या बातम्या आहेत. त्यात निदर्शकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. अन्य ठिकाणी पालकांसोबत त्यांचे शाळा आणि महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थीही जोरदार विरोध करत आहेत.
युरोपात लसीकरणाची मोहीम जोरात सुरू झाली होती. वेगवेगळ्या लसी दिल्या जात होत्या. त्यात कोविशील्ड, मॉडर्ना आदींचा समावेश होता. लसी कमी पडू नयेत या देशांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस खरेदी केल्या होत्या.
मात्र नंतर आलेली बेफिकिरी, दरम्यानच्या काळात मध्येच थांबवण्यात आलेले लसीकरण अथवा अंमलबजावणीतील शिथिलता यामुळे करोनाने पुन्हा डोके वर काढले आणि त्या देशांना पुन्हा लॉकडाऊनचा आश्रय घ्यावा लागला.
मध्यंतरी लसीच्या विरोधात रक्ताच्या गाठी होत असल्याचा झालेला अपप्रचार, त्यानंतर थांबवलेले लसीकरण आणि त्यानंतर विस्कळीत झालेली पुरवठा साखळी याचाही फटका युरोपमधील देशांना बसला आहे.