सातारा – साताऱ्यात सदर बझार व बुधवार नाका या दोन ठिकाणी शहर व परिसरातील 92 सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी रिमझिमत्या पावसामध्ये दुर्गामातेच्या मूर्तींचे तळ्यांमध्ये विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला. दुपारी साडेबारा वाजता तांदूळ आळी येथे प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दुर्गादेवी भक्तांनी मिरवणुकीची मोठी तयारी केली होती.
दुर्गानवमीची आरती, औक्षण ओटी भरण या पारंपरिक विधीनंतर मंडळांच्या देवी दुपारनंतर विसर्जन मिरवणुकीसाठी मोती चौकाकडून बुधवार नाक्याकडे कमानी हौद शेटे चौक मार्गे बाबर कॉलनीकडून विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ झाल्या. गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यासाठी सिध्द करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यातच देवींचे विसर्जन करण्यात आले. जलसंपदा विभागाची सत्तर टनी क्रेन, सातारा पालिकेचे 34 कर्मचारी, 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर अशा व्यवस्थेत मिरवणूक टप्याटप्याने मार्गस्थ होत राहिली.
तब्बल सोळा तास चाललेल्या या मिरवणुकीत 92 देवींचे पारंपरिक पध्दतीने विसर्जन करण्यात आले. रात्री दीड वाजता सदर बझार येथील भारत माता चौकातील नवदुर्गा व मोती चौकातील प्रतापसिंह मंडळांची देवी या समोरासमोर मिरवणुकांच्या निमित्ताने राजपथावर आल्या. मात्र या दोन्ही मंडळांच्या देवींच्या मूर्ती या फायबरच्या बनवण्यात आल्याने वाजत गाजत मिरवणुकीने त्या माघारी नेण्यात आल्या.
सातारकरांनी या विसर्जन मिरवणुकीत हिरहिरीने भाग घेतला. रात्री सव्वादहाच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र मिरवणुकीच्या उत्साहात कोणताही व्यत्यय आला नाही. प्रतापसिंह शेती फार्मच्या पिछाडीला असणाऱ्या विसर्जन तळ्यात 60 तर सदर बझार येथील दगडी शाळा परिसरात बनवण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात 30 देवीचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी पहाटे पावणेपाचच्या दरम्यान शेवटच्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.